वडूज : हुतात्म्यांच्या रक्तरंजित इतिहासाची राज्याला नव्हे तर पूर्ण देशाला ओळख असणाऱ्या वडूज नगरीतील शाळा परिसर शासकीय दिशादर्शक फलक व वाहतुकीला अडथळा ठरलेल्या जागेवरच फ्लेक्स बोर्ड लागल्याने अपघातास निमंत्रण देत शहराचे विद्रुपीकरण तर होत आहे. मात्र तुफान जाहिरातबाजी करीत कित्येक दिवस लावलेल्या बॅनरमुळे शाळा आहे का फ्लेक्स बोर्डचा अड्डा, अशा चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्याच्या मुख्यालयात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत ठरावानुसार भाडेतत्त्वावरील जागेतच फ्लेक्स बोर्ड लावावे या संदर्भात एकमुखी ठराव झाला आहे. एका फ्लेक्ससाठी सात दिवसांकरिता नाममात्र दोनशे रुपये भाडे घेत असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. फ्लेक्सधारकांना याबाबत काही अटी लागू करून नाममात्र दोनशे रुपये भाडे घेऊन तशी नगरपंचायतकडून पावतीही दिली जात आहे. मात्र, फ्लेक्स परवाने व संबंधित पावती ही बंद कमऱ्यातच मिळत असल्याने फ्लेक्सधारकांचे अतिक्रमण फोफावले आहे. राजकीय, सामाजिक कार्यक्रम व नेते मंडळींसह प्रसिद्धीचा हव्यास असलेल्यांचे वाढदिवस तसेच विविध दुकानदारांचे फ्लेक्स तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात झळकत आहेत. त्यामुळे शहराच्या सुशोभीकरणाला गालबोट लागत आहे. तसेच शैक्षणिक संकुल परिसरात ‘आवो जावो घर तुम्हारा’ या उक्तीप्रमाणे फ्लॅट विक्री, खासगी क्लास आदींसह प्रसिद्धीला हपापलेलेंच्या बॅनरची भाऊगर्दी शाळांना अडथळा तर करीत आहेतच, प्रसंगी अपघाताला निमंत्रणही देत आहे.
बरेच दिवसांपासून धूळखात पडलेले फ्लेक्स फलक सध्या हास्यास्पद ठरत आहेत.
चाैकट..
शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?
शहरातील मुख्य चौकाचौकात व प्रमुख रस्त्यावरील वळणावर शासकीय दिशादर्शक फलकांचा आणि प्रसंगी विद्युत व टेलिफोन खांबांचाही सर्रास वापर होऊ लागला आहे. यामुळे रस्त्यापलीकडून आलेली वाहने न दिसल्याने छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडून पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. या सर्वस्वी शहराच्या विद्रुपीकरणाला नेमके जबाबदार कोण, फ्लेक्स बोर्ड लावणारे की ज्यांचा बोर्ड लावला आहे ते..! हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.
१८वडूज
फोटो : शहरातील मुख्य रस्त्यालगत लावलेले फ्लेक्स बोर्ड अडथळे ठरत आहेत. (शेखर जाधव)