नागठाणे : ‘समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे काळाची गरज असून, कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी अंधश्रद्धेला बळी न पडता सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आणि लसीकरण करून घेणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन ‘अंनिस’चे डाॅ. हमीद दाभोलकर यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स ॲण्ड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयातील विवेक वाहिनी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोरोना आणि अंधश्रद्धा’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील होते.
दाभोलकर म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अंधश्रद्धेचे पेव फुटले असून अज्ञान, अंधश्रद्धा आणि समज-गैरसमज यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अंधश्रद्धेतून मुक्त व्हायचे असेल तर शास्त्रीय ज्ञानावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रसारमाध्यमे जेवढी चांगली आहेत तितकीच घातक असून, अफवांचा जलद गतीने प्रसार करतात. त्यामुळे त्याचा समाज जीवनावर विपरीत परिणाम होतो.’
शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘विवेक वाहिनी आणि अंधश्रद्धेचा अतिशय जवळचा संबंध असून विज्ञान-तंत्रज्ञान, निर्भयता आणि नीती इत्यादींच्या माध्यमातून कार्यकारण संबंध तपासून पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत अंगात महापुरुष येणार नाहीत तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही.’
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले. कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. तांत्रिक सहाय प्रा. स्नेहल वरेकर यांनी केले. विवेक वाहिनी समितीचे प्रमुख प्रा. गणेश गभाले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. के. आतार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बालाजी शिनगारे यांनी आभार मानले.