मायणी : ‘खटाव तालुक्यात संकटकाळात लोक स्वतःहून सामाजिक कार्यात सहभागी होतात, त्याचे उदाहरण म्हणजे गावोगावी आयसोलेशन सेंटर उभी राहत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सेवाभावनेने कार्य केले तर कोरोनाची तिसरी लाट निश्चितच थांबविणे शक्य होईल. तिसरी लाट येऊच नये, यासाठी सहकार्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन खटाव-माणचे प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी, धारवाड व मायणी पत्रकार संघ यांच्यातर्फे ‘कोरोनाची संभाव्य तिसरी लाट’ या विषयावर मायणीतील सर्व डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, खटावचे तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. पवार, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ. तुरुकमाने, पोलीस पाटील प्रशांत कोळी, गाव कामगार तलाठी चाटे, पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार जमदाडे म्हणाले, ‘कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे लढत आहेत. कोरोना काळात कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करून मायणीच्या पत्रकार संघाने एक वेगळेपण दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कामांमध्ये मायणीतील पत्रकारांनी दिलेले योगदानदेखील महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तालुका प्रशासन पूर्णतः त्यांच्या पाठीशी राहील.’
डॉ. एम. आर. देशमुख म्हणाले, ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची वाट कशी लावावी, याचा विचार आतापासून करणे गरजेचे आहे व ते लोकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. कोरोना संदर्भातील लोकांची भीती दूर करणे, कोणती काळजी घेतली पाहिजे हे समजणे महत्त्वाचे आहे.’
प्रकाश सुरमुख यांनी प्रास्ताविक केले. अंकुश चव्हाण, महेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
०९ मायणी
मायणी येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची उपाययोजना यावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे व मान्यवर उपस्थित होते.