सातारा : विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य दिले असते तर मराठ्यांची घोडी लंडन आणि पॅरीसच्या सीमांवर छत्रपती शिवरायांनी धडकली असती. अलेक्झांडर आणि नेपोलियन यांच्यापेक्षा महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली, असे उद्गार प्रसिद्ध लेखक 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी काढले. दरम्यान, साताऱ्यात मराठ्यांची राजधानी वसवणाऱ्या छत्रपती शाहूंचे कार्य लाेकांसमोर आणून सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देण्याचा शब्द त्यांनी सातारकरांना दिला.
सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सप्ताहाचा दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे भोसले, नगरसेवक अमोल मोहिते, अशोक मोने, धनंजय जांभळे, रेणु येळगावकर यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, रवी माने, रवींद्र झुटिंग आदी उपस्थित होते.
यावेळी विश्वास पाटील म्हणाले, एखाद्याला तीर्थस्थानाला जायचे असेल तर रायगडाला जा. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जसा समोर आला तसा छत्रपती शिवरायांची चौथी गादी साताऱ्यात ज्या छत्रपती शाहूंनी वसवली त्यांचे कार्य पुढे आलेले नाही.त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांवर कादंबरी लिहणार आहे. थोरले शाहू महाराज एवढे करारी होते की पुण्याचे पेशवे नीट वागेना म्हणून नानासाहेब यांची पेशवाई एक महिन्यासाठी काढून घेतली होती. छत्रपती संभाजी यांच्या पत्नी दुर्गाबाई यांनी ४० वर्षे तर येसूबाई यांनी ३२ वर्षे शत्रुच्या तुरुंगात कंठली आहे.
या दोघांचे निधन कृष्णाच्या काठावर झाले आहे. साताऱ्याचा इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार असल्याचा शब्द विश्वास पाटील यांनी दिला. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी ज्यांच्यामुळे झाली त्यांच्या ते छत्रपती शाहू महाराज अत्यंत कुशल प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळात मराठ्यांचे साम्राज्य अटकेपर्यंत मराठ्यांचे साम्राज्य गेले. त्यांच्या कार्याला लेखणीतून विश्वास पाटील यांनी योग्य न्याय द्यावा, त्यासाठी लागेल ती मदत करू. असे आवाहन त्यांनी केले.
मर्दानी खेळ
शिवराज्याभिषेक सप्ताहास शुभारंभप्रसंगी युवक व बालमावळयांनी थरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पथकातील मुला-मुलींनी भाला, ढाल तलवार, लाठी काठी, दांडपट्टा तसेच अग्नीच्या खेळाची प्रात्यक्षिके केली. या सर्वांना लेखक विश्वास पाटील यांच्याहस्ते गाैरवण्यात आले.
मुधोळच्या घोरपड्यांचा इतिहासा
मुधोळच्या बाजी घोरपड्यांंना नेस्तनाबुत केल्यचा दाखला देताना त्यांनी छत्रपती शिवरायांनाही भाऊबंदकीचा सामना करावा लागला, असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. यावर उपस्थितानी दाद दिली. शिवाय आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही हसून दाद दिली.