सातारा : भारतात सूर्यास्तानंतर सर्व विच्छेदन करण्याची परवानगी नव्हती. मात्र, केंद्र शासनाच्या निर्णयानंतर त्याला परवानगी मिळाली आहे. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात यापूर्वीही शवविच्छेदन केले जात होते. आताही होणार आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेटिंग आता नातेवाइकांना करावे लागणार नाही.
खून, हाणामारी, रस्ते अपघात विविध आजारांतून झालेला मृत्यू, संशयास्पद झालेला मृत्यू, अशा एक ना अनेक कारणास्तव मृतदेह शासकीय रुग्णालयात आणले जातात. मृत्यू झालेल्या मृतदेहाचे विच्छेदन केले जाते. त्यानंतर संबंधित नातेवाइकाच्या मृतदेह ताब्यात दिला जातो आणि त्याचा अहवाल नंतर संबंधित पोलिसांना प्राप्त होतो. गुन्ह्याशी संबंधित असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी उपयोग होतो. शवविच्छेदनाला किमान दोन आणि जास्तीत जास्त सहा तास लागतात. शासकीय रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
ही घ्या उदाहरणे
गेल्या दोन वर्षांपूर्वी अपघातामध्ये दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वास्तविक मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक पर जिल्ह्यातून आले होते. त्यांना तत्काळ शवविच्छेदन करून हवे होते. मात्र, डॉक्टर रात्र झाल्यामुळे टाळाटाळ करत होते. सरतेशेवटी नातेवाइकांनी विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करून दिले.
बरेचदा अपघात झाल्यानंतर रात्री नऊ किंवा दहा वाजता मृतदेह शवागृहात ठेवले जातात. नातेवाइकांनी कितीही विनंती केली तरी काही डॉक्टर सकाळी शवविच्छदन केले जाईल. सकाळी या, असे सांगतात. मात्र, स्थानिक नातेवाईक असेल तर ठीक; परंतु पर जिल्हा अथवा परराज्यातून आलेले नातेवाईक रात्रभर मृतदेह ताब्यात कधी मिळेल, याची वाट पाहत बसतात. काही महिन्यांपूर्वी अपघातात ठार झालेल्या युवकाचे शवविच्छेदन सकाळी करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. हे नातेवाइक रात्रभर सिव्हिलसमोर बसले होते.
शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन रात्रीही केले जाते. सोयी-सुविधा तर आहेतच. शिवाय कर्मचारीही आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नसल्याने शवविच्छेदनाला अडचण येत नाही. नातेवाइकांना वेळेत मृदतेह दिला जातो. - मनोहर काकडे, कर्मचारी सिव्हिल हाॅस्पिटल, सातारा
आपल्याकडे शवविच्छेदनाला वेळ लागत नाही. रात्रीही शवविच्छेदन केले जाते. खूपच क्रिटिकल असेल तर रात्री शवविच्छेदन केले जात नाही. शवविच्छेदनासाठी वेगळी इमारत आहे. -डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
पंचनामा उशिरा मिळतो
- जिल्ह्यात एखादा घटनेतील रुग्णाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला तर त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत पंचनामा मिळत नाही. तोपर्यंत शवविच्छेदन केले जात नाही.
- शेंद्रे येथील अपघात झालेल्या युवकाच्या मृतदेहाचा पंचनामा सातारा तालुका पोलिसांनी तत्काळ दिल्यामुळे सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले.