सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही वर्षांपासून थोडे निर्धास्त झाले होते. गावापर्यंत येणाऱ्या रस्त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. पण, पुन्हा यावर्षी पावसाने दिलासा देणारा हा रस्ताच वाहून नेला आणि पुन्हा या भागातील लोकांना पहिले दिवस आठवले. सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील पळसावडे आणि त्यापुढील गावांना जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे आता या लोकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी २० ते २५ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.
सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या पळसावडे, बोंडारवाडी आणि सांडवली या गावांना जाणारा रस्ता या पावसात रस्ता खचला आहे. घाटमाथ्यावरच रस्ता खचल्याने नवीन रस्ता करणे अवघड झाले आहे. या गावांना आता पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला आणि या गावांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या आमदार फंडातून रस्ते बनविले. त्यामुळे लोकांची सोय झाली होती. पण, या पावसात पुन्हा हे रस्ते धुऊन गेले. रस्त्यावरची खडी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. डोंगराचा भागच खचल्यामुळे रस्त्यासह मोठा भाग दरीत कोसळला आहे. अशा परिस्थितीत आता लवकर रस्ता होणे अवघड दिसत आहे.
रस्ता वाहून गेल्यानंतर आमदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. मात्र, तातडीच्या उपाययोजना करण्यासाठीही काही दिवस जाणार आहेत. तोपर्यंत या गावांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आता खचून गेलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूने किमान गाडी जाईल, असा रस्ता करण्याची अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. पण, पावसात तो टिकणार का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने या गावांचा संपर्काचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. नोकरदार आणि गावातून ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली असून, त्यांना अलीकडे गाडी ठेवून पलीकडे पायी चालत जावे लागत आहे. तर पलीकडच्या बाजूला असलेल्या लोकांच्या गाड्या त्याच बाजूला अडकून पडल्या आहेत.
चौकट
पावसाळ्यातील आपत्ती ठरलेलीच
पावसाळ्यात या परिसरात रस्ता खचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना ठरलेल्याच असतात. पण, यावर्षी कमी कालावधीत झालेला प्रचंड पाऊस सर्वांसाठीच अडचणीचा ठरलेला आहे. २४ तासांत कोयना धरणात वाढलेले १७ टीएमसी पाणी याचेच प्रत्यंतर आहे. अजूनही या भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस थांबल्यानंतरच आता याठिकाणच्या पायाभूत सुविधा पुन्हा पुनर्स्थापित करता येणार आहेत.
कोट
पळसावडे आणि बोंडारवाडीच्या लोकांसाठी पर्यायी रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणची परिस्थिती स्वत: जाऊन पाहून आलो आहे. त्यांच्या अडचणीबाबतही कल्पना आहे. काही दिवसांतच त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग होईल आणि वाहून गेलेला मार्गही दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लोकांची अडचण होणार नाही अशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल.
शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार