सातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने किल्ले प्रतापगडावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही लोकांतच हा कार्यक्रम झाला. पालखी मिरवणूकही साध्या पद्धतीने काढण्यात आली. दरम्यान, जयंतीच्या निमित्ताने गडावर आलेल्या शिवप्रेमींनी जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत वातावरण शिवमय करून टाकले होते.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने १९ फेब्रुवारीला महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी केली जाते. त्यासाठी आठ दिवस अगोदर पूर्ण तयारी करण्यात येते. कारण, पदाधिकारी आणि अधिकारी तसेच सदस्यही जयंतीच्या पूर्वसंध्येला महाबळेश्वरात पोहोचलेले असतात. सर्वांचा मुक्काम असतो तर शिवजयंतीच्या दिवशी सूर्योदयाला सर्वजण किल्ले प्रतापगडावर असतात.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती सोहळा सोशल डिस्टन्स, कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. शुक्रवारी सकाळी सव्वासातला प्रतापगडावरील श्री भवानी मातेस अभिषेक जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते घालण्यात आला. त्यानंतर भवानी मातेची महापूजाही दोघांच्या हस्ते झाली. सकाळी ९ वाजता श्री भवानी माता मंदिरासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, कुंभरोशीच्या सरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या ध्वजारोहणानंतर मंदिरासमोरून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. साध्या पद्धतीने व विनावाद्याची पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अध्यक्ष कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दुपारी श्री भवानी माता मंदिरात महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट :
कार्यक्रम शांततेत पार...
या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आणि त्यांच्या टीमने चार दिवसांपासून पूर्ण तयारी केली होती. नियोजन योग्य झाल्याने विनाअडथळा सर्व कार्यक्रम शांततेत आणि मोजक्या लोकांत पार पडले.
फोटो दि.१९सातारा प्रतापगड फोटो...
फोटो ओळ : महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषदेच्या वतीने शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह अविनाश फडतरे, सुनील शिंदे, मनोज ससे, मनोज जाधव, संतोष धोत्रे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. संजय शिंदे आदी. (छाया : नितीन काळेल)
...........................................