सातारा : क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांनी साताऱ्याच्या जेलच्या भिंतीवरून उडी मारून भूमिगत झालेल्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त उद्या, शुक्रवार, दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता सातारा कारागृहाच्या बाहेर सातारा जेल फोड शौर्यदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.,चे चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली.
स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे ब्रिटिश सरकारच्या विरोधातील प्रतिसरकारच्या माध्यमातून केलेले काम व त्यांचे योगदान मोलाचे आहे. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील या धाडसी कामाबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने पकडून इस्लामपूर येथील कारागृहात ठेवले होते; पण तेथे ठेवणे त्यांना अडचणीचे वाटू लागल्याने त्यांना सातारच्या कारागृहात हलविण्यात आले. मात्र, या कारागृहाच्या अभेद्य तटाच्या भिंतीवरून आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी उडी मारून भूमिगत झाले. या ऐतिहासिक घटनेस उद्या, शुक्रवार, दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.