म्हसवड : गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयप्रकाश शिवाजी कट्टे, तर उपसरपंचपदी संजय दादा माने यांची बहुमताने निवड झाली. तीर्थक्षेत्र विकासाबरोबरच ग्रामविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
येथील ग्रामपंचायत पंधरा सदस्यांची आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नऊ, भाजपचे पाच व एक अपक्ष असे सदस्य निवडून आले आहेत. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडल्या.
या निवडीसाठी सदस्यांच्या म्हणण्यानुसार गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी जयप्रकाश कट्टे व प्रवीण कट्टे यांनी, तर उपसरपंचपदासाठी संजय माने व उज्ज्वला फडतरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये जयप्रकाश कट्टे व संजय माने यांना प्रत्येकी दहा मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यू. टी. आंधळे व बी. एस. टिळेकर यांनी काम पाहिले.
दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच जयप्रकाश कट्टे यांनी सांगितले. ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन उपसरपंच संजय माने यांनी सर्व सदस्यांना केले.
या निवडीबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव कट्टे, सूरज पाटील, अंगराज कट्टे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अमृत पाटील तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.
फोटो..
२५जयप्रकाश कट्टे
२५संजय माने