निलेश साळुंखेकोयनानगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या पाटण तालुका बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान बंदवेळी पाटण शहरात कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रास्ता रोको करीत मराठा समाजाने राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान, शहरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.जालन्यात मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. मात्र, त्याला शुक्रवारी गालबोट लागले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. पाटणमध्येही मराठा समाजकडून बंदची हाक देण्यात आली होती.आज, सोमवार सकाळी 11 वाजता शहरातील झेंडाचौकात सकल मराठा समाजातील बांधव एकत्रित आले होते. अत्यावश्यक सेवा व शाळा महाविद्यालय वगळता नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला. आठवडा बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यामुळे व्यापारीपेठेत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. काही काळ पाटण आगारातून एसटीची वाहतूकही बंद करण्यात आली होती. या बंदमुळे लोकांची मात्र काहीकाळ गैरसोय झाली. दरम्यान, कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रास्ता रोको केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी एक मराठा लाख मराठा..आदी घोषणा देत राज्यसरकारचा विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार रमेश पाटील यांना मराठा समाज बांधवांकडून निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: पाटणमधे कराड-चिपळूण महामार्ग रोखला
By दीपक शिंदे | Published: September 04, 2023 2:21 PM