सातारा : कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च न दिल्याचा फटका अपात्र सदस्यांना बसला आहे. नंदा बाळकृष्ण शिंदे, राजेंद्र बबन घोरपडे, कविता दशरथ घाडगे, राणी शरद घोरपडे, साधना बाळासो लोंढे, दस्तगीर निजाम मुलाणी (सर्व रा. जांब खुर्द) अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत. जांब खुर्द ग्रामपंचायतीमधील सात जागांपैकी सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी जांब खुर्द येथील विवेक प्रदीप शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत अपात्र ठरलेल्या सदस्यांनी २३ आक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला नाही, त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख (१) अन्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे म्हटले होते. दरम्यान, या संदर्भाने अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना नोटिसा काढून ८ जून २०१५ ही सुनावणीची तारीख ठेवली. दोन्ही बाजूंचे वकीलपत्र दाखल करून घेण्यात आले होते. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यापैकी नंदा शिंदे, राजेंद्र घोरपडे, कविता घाडगे, साधना लोंढे यांनी आपले लेखी म्हणणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. उर्वरित राणी घोरपडे, दस्तगीर मुलाणी यांना संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. ज्यांनी म्हणणे सादर केले ते समर्थनीय नसल्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याच्या निष्कर्षाप्रत आल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी या प्रकरणात निकाल देऊन सहा सदस्यांना अपात्र ठरविले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अभिजित माने, अॅड. भय्यासाहेब जगदाळे व अॅड. सतीश कदम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) अपात्र सदस्यांवर पाच वर्षे निर्बंध अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या या सहा ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना आता पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. आणखी एकाचा ‘स्वाइन’मुळे मृत्यू सातारा : जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या साथीने सहावा बळी घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना माण तालुक्यातील एका रुग्णाचा झालेला मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला असल्याचे वैद्यकीय अहवालातून दिसून आले आहे. आनंद दगडू जगदाळे (वय ४०, रा. डांगिरेवाडी, ता. माण) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी (दि. ८) जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, त्यात हा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचा निष्कर्ष आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण उपचार घेत असून, पाच संशयितांना उपचारांसाठी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)
जांबचे सहा ग्रामपंचायत सदस्य अपात्र
By admin | Published: September 11, 2015 12:42 AM