पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या माउली जमदाडे याने दिल्लीचा पैलवान भोलो याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून श्री सेवागिरी केसरीपदावर आपले नाव कोरले. या मैदानात डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या झाल्या. दरम्यान, सेनादलातील कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने कोल्हापूरच्या विजय धुमाळला घिस्सा लावून अस्मान दाखवले. ही कुस्ती या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट, आकर्षक व प्रेक्षणीय कुस्ती ठरली. कुस्ती शौकिनांनी कार्तिकवर बक्षिसांचा वर्षाव केला. येथील यात्रास्थळाजवळच सेवागिरी देवस्थान ट्रस्टने बांधलेल्या भव्य आखाड्यात या कुस्त्या झाल्या. या कुस्ती आखाड्यातील उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था व बैठक व्यवस्थेमुळे हजारो शौकिनांना कुस्तीदंगलचा आनंद घेता आला. या आखाड्यात राज्यातील नामांकित पहिलवानांच्या मुख्य लढतीत पुण्याच्या कौतुक डाफळे याने मोळी डावावर पुण्याच्याच भारत मदने याला अस्मान दाखवले. पुण्याच्या गोकूळ आवारे याने कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याला एकचक डावार चितपट केले. समोरून लपेट लावून कोल्हापूरच्या मारुती जाधव याने पुण्याच्या पोपट घोडकेला चितपट केले. पुण्याच्या संदीप काळे याने कोल्हापूरच्या महेश वरुटेवर विजय मिळविला. पुण्याच्या बापू मदने याने दिल्लीच्या अमितकुमारला तसेच इचलकरंजीच्या महादेव वाघमोडे याने गदालोड डावावर पुण्याच्या शैलेश शेळकेला लोळविले. सांगलीचा संदीप हिप्परकर हा जखमी झाल्याने आंबेगावच्या उदय पवार याला विजयी घोषित करण्यात आले. खुडुसच्या लखन पांढरेने कोल्हापूरच्या संतोष लवटेवर एकचक डावावर मात केली. इचलकरंजीच्या बाळू पुजारीने मुरगुडच्या सोन्या सोनटक्केवर घिस्सा डावावर झटपट मात केली. पुण्याचा अरुण खेंगले व सोनबा गोंगाणे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. कृष्णात जाधव, विजय जाधव, सुभाष माने, हणमंतराव गायकवाड, विकास जाधव, श्रीमंत जाधव, सुरेश शिंदे, नितीन राजगे, राजेंद्र कणसे, मधुकर शिंदे, अधिक जाधव, तानाजी मांडवे, सोहराब शिकलगार, अंकुश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. दरम्यान, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, कृष्णात जाधव, विजय जाधव, ट्रस्टचे विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव यांनी मैदानाचे उद्घाटन केले. (वार्ताहर) जिल्हास्तरीय युवा महोत्सवपुसेगाव : येथील वार्षिक यात्रेनिमित्त दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता पुणे विभागाचे शिक्षण संचालक नामदेवराव जरग यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार व दहिवडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते या युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ उपस्थित राहणार आहेत. तसेच मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सर्व विश्वस्त तसेच प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्रा. आर. आर. गायकवाड, प्रा. डी. पी. शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे, युवा महोत्सव समितीचे सचिव प्रा. संजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रा कालावधीत होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमाबरोबरच विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यावर ट्रस्टने भर दिला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देवस्थान ट्रस्टने युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
जमदाडेकडून दिल्लीच्या भोलोला अस्मान
By admin | Published: December 29, 2016 10:22 PM