सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा लौकिक असणारी व जिल्ह्यात मुख्य कार्यालयासहित एकूण १७ शाखांद्वारे जिल्हावासीयांना बँकिंग सेवा देणारी जिल्ह्यातील अग्रणी जनता सहकारी बँक लि. साताराने गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन कोटी २५ लाख इतका विक्रमी नफा कमविला आहे. बँक लवकरच सभासदांना लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे शिफारस करणार आहे, अशी माहिती भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
कुलकर्णी यांनी यावेळी बँकेच्या सभासदांनी, ठेवीदारांनी, कर्जदारांनी बँकेवर दाखविलेला विश्वास, बँकेच्या सर्व संचालक मंडळाने एकमुखाने घेतलेले धोरणात्मक निर्णय व संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयाची सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे केलेली अंमलबजावणी यामुळेच बँकेने मागील पाच वर्षांत दोनदा तोट्यात गेलेली बँक पुन्हा नफ्यात आणण्याचे अभूतपूर्व, प्रेरणादायी व शून्यातून पुन्हा उभे राहण्याचा आदर्श घेण्यासारखे अप्रतिम असे यश संपादन केल्याचे सांगितले. बँकेचे एन.पी. कर्ज खात्यांमध्ये विक्रमी अशी ११ कोटींची कर्जवसुली केलेली आहे. त्यामुळे नेट एन.पी.ए.चे प्रमाण ८.३० टक्के, त्याचप्रमाणे बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सी.आर.ए.आर. हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे कमीत कमी ९ टक्के राखणे आवश्यक असताना बँकेने मार्च २०२१ अखेर तब्बल १६.३१ टक्के इतका सी.आर.ए.आर. राखून बँकेची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे.
बँकेच्या या यशात बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, ज्येष्ठ संचालक जयवंतराव भोसले, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, माधव सारडा, डॉ. चेतना माजगावकर, सुजाता राजेमहाडिक, अशोक मोने, प्रा. अरुणकुमार यादव, चंद्रशेखर घोडके (सराफ), वसंतराव लेवे, अविनाश बाचल, निशांत पाटील, रवींद्र माने, रामचंद्र साठे, वजीर नदाफ, नारायण लोहार, विजय बडेकर, तज्ज्ञ संचालक धीरज कासट, ओंकार पोतदार, निमंत्रित संचालक प्रीतम शहा, अजित साळुंखे, सेवक संचालक अनिल जठार, अनिल चिटणीस, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. (वा. प्र.)