सातारा : सातारा शहर आणि तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने झाली. विशेष म्हणजे २५ फेब्रुवारीला शासनाने सहकारी बँकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेणारी जनता बँक राज्यातील पहिलीच ठरली आहे.
बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयामध्ये ऑनलाइन पद्धतीने चेअरमन अतुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बँकेचे चेअरमन अतुल जाधव म्हणाले, बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कमीत कमी ९ टक्के राखणे आवश्यक असताना बँकेने हे प्रमाण १५.८७ टक्के असे अतिरिक्त राखलेले आहे. बँकेस चालू आर्थिक वर्षात ६ लाख ३८ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. मागील आर्थिक वर्षात थकीत कर्ज वसुलीकामी राबविलेले कठोर धोरण चालू आर्थिक वर्षात देखील राबवून एनपीए कर्जाच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचे चांगले परिणाम या वर्षाखेर निश्चितच दिसून येतील. त्यामुळे बँकेचा संचित तोटा पूर्ण भरून निघेल व रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने सभासदांना लाभांशही जाहीर करण्याच्या स्थितीत बँक येईल.
या सभेस बँकेचे भागधारक पॅनलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, व्हाइस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक जयेंद्र चव्हाण, डॉ. चेतना माजगावकर, सुजाता राजेमहाडिक, वजीर नदाफ, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, विजय बडेकर, सेवक संचालक अनिल जठार, अनिल चिटणीस तसेच निमंत्रित संचालक अजित साळुंखे यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. (वा.प्र.)
फोटो :
जनता बँकेच्या सभेप्रसंगी कोरोनाकाळात मृत झालेल्या देशबांधवांना भागधारक पॅनलकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.