कुडाळ : जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १८ जागा जिंकून बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवली आहे. माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, माजी जि. प. सदस्य दीपक पवार तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या एकत्रित महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले होते. यासाठी आपले सर्व राजकीय संघर्ष बाजूला ठेवून संस्थेवरचा निवडणुकीचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी तीन आमदार एकत्रित आले. मात्र, या प्रक्रियेत आपल्याला विचारात घेतले नाही असा आरोप करीत आमदार सदाशिव सपकाळ व माजी जि. प. सदस्य दीपक पवार यांनी महाविकास आघाडीचे पॅनल उभे केले. यामुळे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल अशी लढत झाली. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये सरासरी ८४ टक्के मतदान झाले. यात महाविकास आघाडी नेमके किती मतदान घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी योगिता राजेंद्र शिंदे, कमल दिलीप दळवी, इतर मागास प्रवर्गातील मनेष जयसिंग फरांदे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून तुकाराम जाणू शिंदे, हमाल मापाडी मतदारसंघातून सुंदर गोविंद भालेराव तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधीमधून रामचंद्र धोंडीबा भोसले बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यात शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मताधिक्याने विजय मिळवला.कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून हनुमंत सहदेव शिंगटे, प्रमोद बाजीराव शेलार, प्रमोद शंकर शिंदे, मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक, जयदीप शिवाजीराव शिंदे, हेमंत हिंदुराव शिंदे, राजेंद्र सखाराम भिलारे ,ग्रामपंचायत मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून पांडुरंग नामाजी कारंडे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून गुलाब विठ्ठल गोळे, बुवासाहेब एकनाथराव पिसाळ तर व्यापारी अडते मतदार संघातून प्रकाश कृष्णाजी जेधे, दत्तात्रय कोंडीबा कदम यांनी विजय मिळवला आहे.
APMC Election Result: जावळी, महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनलकडे; महाविकास आघाडीचा दारूण पराभव
By दीपक शिंदे | Published: April 29, 2023 1:50 PM