मेढा : छत्रपती शिवरायांचा जयघोष, जावळीच्या डोंगर कपारीतून घुमलेला ‘एक मराठा, लाख मराठा’चा हुंकार, तरुणांचा उत्साह अन् दि. ३ आॅक्टोबरच्या महामोर्चासाठी जावळीच्याकडे कपारीतील मराठा मावळ्यांनी माता-भगिनींना केलेल्या आवाहनाने जावळी तालुका ‘मराठामय’ झाला. निमित्त होते मराठा महामोर्चाच्या प्रसारासाठी काढलेल्या दुचाकी रॅलीचे!सातारा येथे दि. ३ आॅक्टोबरला होणाऱ्या महामोर्चात संपूर्ण जावळी तालुका सहभागी होण्याच्या दृष्टीने या महामोर्चाच्या प्रसाराचा एक भाग म्हणून संयोजकांनी रविवारी मेढा ते बोंडारवाडी व परत मेढा अशा दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचा प्रारंभ मेढा येथील मुख्य बाजार चौकात करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा,’ या घोषणांच्या जयघोषात एका चिमुरडीच्या हस्ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो युवक आपल्या दुचाकीसह सहभागी झाले. प्रत्येक दुचाकीवर भगवा ध्वज, फेटे बांधलेले युवक, युवकांचा उत्साह अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही रॅली काढण्यात आली. मामुर्डी येथे असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एका युवतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेढा-करंजे-चोरांबे-मामुर्डी-केळघर-केडंबे-पुनवडी-म्हाते-वागदरे-गोंदेमाळ-मोहाट-पिंपरी-गांजे-कुसुंबी-निझरे-धनकवडी- वेण्णानगर-मोरावळे -भणंग-ओझरे-रिटकवली-बिभवी-जवळवाडी या गावांतून परत मेढा येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यानंतर मेढा रॅली काढण्यात आली.समारोपप्रसंगी महामोर्चात पाळावयाच्या सूचना, घ्यावयाची काळजी आदींबाबत संयोजकांनी मार्गदर्शन केले. या रॅलीने जावळीतील मेढा शहर व परिसरासह दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये जनजागृती झाल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी)
जावळी तालुका ‘मराठामय’
By admin | Published: September 26, 2016 10:40 PM