सातारा : पालिका निवडणुकीतील ताणतणाव विसरून दोन्ही राजेंनी साताऱ्याच्या विकासासाठी एकत्र यावं, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उदयनराजेंकडे व्यक्त केली. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांची सोमवारी रात्री साताऱ्यात एका हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत शिवेंद्रसिंहराजेंनी ‘विधानसभेसाठी’चा शब्द मागितल्याचे वृत्त आहे.
राजघराण्यातील ज्येष्ठांच्या पुढाकाराने दीड दशकांपूर्वी झालेल्या मनोमीलनाला पालिकेच्या निवडणुकीत तडा गेला. हा वाद गेल्या काही महिन्यांत खूपच शिगेला पोहोचला होता. लोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना दिली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा हिय्याही शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाने केला होता. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढून सगळे एकच असल्याचं चित्र निर्माण केलं. प्रत्यक्षात मात्र आमदार-खासदार समोरासमोर बैठकीसाठी येत नसल्यामुळे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. पाटील यांनी फोन केल्यामुळेच उदयनराजे यांनी सोमवारी रात्री शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली.
या भेटीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विधानसभेला मदत करण्याचा शब्द मागितला. दोघांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना समजावणे तसेच सातारा पालिकेतील स्थिती आहे तशीच ठेवण्यापर्यंत चर्चा केली. यापुढे दोघांनीही एकमेकांच्या निवडणुकीत मदत करण्याची भूमिका घेतली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांच्यासह डॉ. चंद्रशेखर घोरपडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील, काँंग्रेसचे सरचिटणीस सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, अक्षय जाधव उपस्थित होते.तालुक्यात मेळाव्याद्वारे मनोमीलनाची घोषणासातारा पालिका निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा पराभव पचवणं नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अवघड झालं. त्यामुळे पक्षीय पातळीवर मनोमीलनाचे आदेश आले असले तरी आमदार समर्थकांना हे अमान्य आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे लवकरच तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात ते मनोमीलनाची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले.