अजित पवार यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; सातारा जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत
By दीपक देशमुख | Published: September 10, 2023 04:14 PM2023-09-10T16:14:44+5:302023-09-10T16:14:58+5:30
राष्ट्रवादीत बंड करून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात आले.
सातारा: राष्ट्रवादीत बंड करून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यांचे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी झुंबड उडाली. कुठे फटाक्यांची आतषबाजी कुठे जोरदार घोषणा देण्यात आल्या. उंब्रजमध्ये तर जेसीबीतून अजित पवार यांच्यावर फुलांचा वर्षावर करण्यात आला.
कोल्हापूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी अजित पवार जात असले तरी जिल्हयात ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून सत्कार स्वीकारणार होते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमानुसार नियोजित ठिकाणी कार्यकर्ते प्रतिक्षा करत होते. शिरवळ, खंडाळा, वेळे, जोशी विहीर, भुईंज, पाचवड, वाढे फाटा, बाँबे रेस्टॉरंट, नागठाणे आदी ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. महामार्गावर ठिकठिकाणी अजित पवार ताफा थांबवून स्वागत कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारत होते. वाढे फाटा येथे किरण साबळे पाटील तसेच कार्यकर्त्यांनी पवार यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.
यानंतर बाँबे रेस्टॉरंट येथे ताफा आल्यानंतर अमित कदम, जयवंत घोरपडे, चंद्रकांत जाधव, श्रीमंत झांजूर्णे, सचिन साळुंखे, राजुकाका भोसले, शिवाजीराव महाडिक, अरुण माने, राजाभाऊ जगदाळे, संजय पिसाळ, नानासाहेब भिलारे, अजय कदम, सिद्धेश्वर पुस्तके, शिक्षक संघटना, मराठा बिझनेस फोरमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते माेठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यानंतर ताफा नागठाणे, कऱ्हाडच्या दिशेने रवाना झाला.