पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील वेळे (ता. वाई) येथे सातारा बाजूकडे दुचाकीवरून निघालेले भगवान आप्पा धायगुडे (वय ३१) आणि उमा भगवान धायगुडे (वय २४, रा.बोरी, ता.खंडाळा) हे नवदाम्पत्य आपल्या दुचाकी (एमएच ११ बीआर ५२२८) वरून निघाले असता, वेळे गावच्या हद्दीत मागून आलेल्या जीप(एमएच १४ जीएच ५०११)ने जोरदार धडक दिल्याने, दुचाकी सर्व्हिस रोडच्या कठड्याला घासत गेली. यावेळी झालेल्या अपघातात नवविवाहिता उमा हिला डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
घटना बुधवार, दि. १५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या दाम्पत्याचा विवाह दोनच महिन्यांपूर्वी झाला होता. याबाबत रात्री उशिरा भुईंज पोलिसांत नोंद झाली असून, अधिक तपास भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करीत आहेत.
चौकट...
महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
भुईंज पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, वाढीव टोल घेणारे ठेकेदार मात्र गब्बर झाले आहेत. अनेक वेळा भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रव्यवहार व विनंतीवजा फोन करूनही याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. महामार्गावरील खड्डे भरण्यात आले नसल्याने, अनेक अपघातांची जणू रोजच मालिका सुरू आहे.
सोबत फोटो पाठविला आहे.