मलकापूर : रुग्णाला घेऊन कऱ्हाडकडे निघालेल्या भरधाव जीपची छोटाहत्ती टेम्पोसह दुचाकीला पाठीमागून धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहने महामार्गावरच उलटली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर टेम्पोचालकासह जीपचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.
शिवम ऊर्फ विशाल निवृती यादव (वय ३५, सध्या रा. मुंढे, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नावे आहे. तर जीपचालक गणेश सुरेश यलार (४०, रा, काशिळ) व टेम्पोचालक सुशील संतोष गायकवाड (रा. शेणोली) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यलार हे जीप (एमएच ५० एल ०१८९) मधून काशिळ येथून गंभीर रुग्ण घेऊन कऱ्हाडमधील रुग्णालयात जात होते. महामार्गावरून येत असताना कऱ्हाड येथील एका हॉटेलसमोर आले असता लाकडे भरून कऱ्हाडमधेच जात असलेल्या छोटा हत्ती टेम्पो (एमएच ११ एजी ५१३८) ला जीपने पाठीमागून धडक दिली. या धडकेत टेम्पो महामार्गावरच उलटला. नेमके त्याचवेळी कऱ्हाडकडे निघालेल्या दुचाकी (एमएच ५० पी ९६७६) ला दोन्हीही वाहनांची धडक झाली.
या तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, चंद्रकांत जवळगेकर, सुदेश दोरा, धनंजय घारे यांच्यासह कराड शहर पोलीस ठाण्याचे खलिल इनामदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमींना मदत करून घटनेचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला.