सातारा - साताऱ्यात तीनशे फूट खोल दरीत जीप कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानं ही जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे भोजलिंगाच्या डोंगरावरून खालच्या बाजूनं प्रवास करताना जीप खोल दरीत कोसळली.
शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे (सांगली), मनिषा आटपाडकर, कंठेमाला कलास आटपाडकर (सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पोर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.
आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने (एमएच १० सी ३४४१) तेरा भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने पुन्हा आपापल्या गावी निघाले होते. डोंगरावरून खाली येत असताना अचानक जीपचे चाक घसरले. या घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट 300 फूट दरीत कोसळली. या जीपचे हूड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली. या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणा-या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले.
मिळेल त्या वाहनाने सर्व जखमींना तत्काळ म्हसवड येथील रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.