सातारा : तीन जिल्ह्यांतून वाँटेड असलेल्या अट्टल चोरट्याकडून सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल ६६ तोळे सोन्यासह ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या रेकाॅर्ड ब्रेक कारवाईमुळे दागिने चोरीस गेलेल्या फिर्यादींना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेश उर्फ म्हावड्या मंगेश काळे (वय २१, रा. विसापूर, ता. खटाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदाराच्या माध्यमातून पोलिस रेकॉर्डवरील अट्टल चोरटा महेश काळे हा फलटण परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीबीचे पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले.
या पथकाने फलटणमधील नाना पाटील चौकात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अन्य साथीदार ऋतुराज भावज्या शिंदे (रा. खातगुण, ता. खटाव), कोहिनूर जाकीर काळे (रा. मोळ, ता. खटाव), वंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे (रा. विसापूर), अभय काळे (रा. मोळ), अतिक्रमण काळे (रा. खातगुण) यांच्यासोबत विविध ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. या सर्व साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश काळे याला सहा दिवसांची तर ऋतुराज शिंदे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
पोलिस कोठडीत असताना आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता एकूण १६ घरफोडीचे गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले. कोरेगाव, औंध, वडूज, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड, उंब्रज, फलटण, सातारा शहर, कऱ्हाड या ठिकाणी आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, सनी आवटे, अमृत कर्पे, पंकज बेसके, हसन तडवी, राकेश खांडके, राजू कांबळे, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, केतन शिंदे, धीरज महाडिक आदींनी भाग घेतला.
वर्षभरात तब्बल २३५ तोळे सोन जप्त..
स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये तब्बल ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी तब्बल २३५ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. याची किंमत १ कोटी ८२ लाख ९६ हजार ८३० रुपये इतकी आहे.