सातारा : ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून घेऊन फसवणूक केली.या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता मंगळवार तळ्याजवळ घडली. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी सीताराम वास्के (वय ७८, रा. मोरे काॅलनी, व्यंकटपुरा पेठ, सातारा) हे सेवानिवृत्त असून, सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ते मंगळवार तळ्याजवळून चालत निघाले होते. त्यावेळी तेथे दोन तरुण आले. ‘तुम्ही पुढे जाऊ नका, चाैगुले यांच्या भावावर चाकूने वार झालेत. दागिने तुम्हाला कागदाच्या पुडीत व्यवस्थित बांधून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर वास्के यांनी एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी तसेच दोन तोळ्यांची चेन काढून दिली. हे दागिने पुडीत बांधत असल्याची हातचलाखी करून चोरट्यांनी स्वत:जवळ काढून घेतले. मात्र, पुडीमध्ये दोन दगडाचे खडे बांधून पुडी त्यांच्याकडे दिली. काही अंतर पुढे गेल्यानंतर वास्के यांनी पुडी उघडली असता त्यामध्ये दोन खडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फाैजदार एस. एम. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांकडून कसोशिने प्रयत्नवृद्धांना फसवणारी टोळी सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धुडगूस घालत आहे. वृद्ध लोकांना हेरून त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. ही टोळी पकडण्यासाठी पोलिसांकडून कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यामुळे शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.