आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथील तलाठी बजरंग लांडगे आणि कोतवाल गौरीहर लोहार यांना वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून ढकलून देऊन धमकी दिली. बुधवारी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी लांडगे यांनी हणमंत सदाशिव निमगिरे (रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्यासह दोघांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, झरे येथील तलाठी बजरंग लांडगे यांनी बुधवारी वाळू तस्करी करणारे दोन डंपर ( एमएच ४५-११३५ आणि एमएच ४५-०८२३) अडवून चालकांकडे वाळू वाहतूक परवान्याची मागणी केली. त्यावेळी चालक निमगिरे याच्यासह दोघांनी लांडगे यांना धमकी देऊन, त्यांना ढकलून व धक्काबुक्की करून म्हसवड (ता. माण) गावाकडे पलायन केले. त्यानंतर लांडगे यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधून पोलिसांसह भरारीपथक मागवून घेतले. पथकाने वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालक रस्त्याकडेला वाळू ओतून डंपर खाली करून जात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी भरारी पथकाने पकडले.त्यानंतर पंचनामा करून तलाठी लांडगे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, दमदाटी व धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला.रस्त्यावर ओतलेली वाळू जप्त करून आटपाडी तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केली आहे आणि डंपर आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दुसऱ्यांदा कारवाईया वाहनांचा मालक बापू करचे (रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असून यापूर्वीही त्याच्याविरुद्ध खरसुंडी येथे अनधिकृत वाळू वाहतुकीबाबत कारवाई केली असता त्याने आटपाडी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती तहसीलदार कट्यारे यांनी दिली. (वार्ताहर)
झरेत तलाठी, कोतवालाला धक्काबुक्की
By admin | Published: June 26, 2015 12:43 AM