सातारा : राज्यात १९९५ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अनेक धरणांची महत्त्वाकांक्षी कामे हाती घेण्यात आली. त्यातील जिहे कटापूर, महू हातगेघर आणि वांग मराठवाडी, तारळी या प्रकल्पांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जिहे कटापूर प्रकल्पाचा सुरुवातीचा अपेक्षित खर्च होता २६९ कोटी रुपये, आता तो तब्बल १ हजार ३३० कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
प्रकल्प रखडत सुरू राहत असल्याने या प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये धोम, उरमोडी, कोयना, वीर, कण्हेर या धरणांची कामे यशस्वीपणे झाल्याने त्या धरणांचा फायदा आता शेतकरी व नदीकाठच्या लोकांना देखील होत आहे. मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले, मात्र जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहेत. जिहे कटापूर, महू हातगेघर, वांग मराठवाडी, तारळी या प्रकल्पांची कामे जर लवकर पूर्ण झाली, तर शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून त्यातून शेतकरी बागायती पिके घेऊन आपली प्रगती साधू शकणार आहेत. शासनाने हे प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिहे कटापूर
जिहे कटापूर हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे माण, खटाव या दोन तालुक्यांतील २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १९९५ साली प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रकल्पाची मूळ किंमत २६९ कोटी रुपये होती. आता याच प्रकल्पाची किंमत १ हजार ३३० कोटी रुपये इतकी वाढलेली आहे. येत्या जून महिन्यात कृष्णेतून पाणी उचलून ते नेर धरणात सोडण्यात येणार आहे.
...................
महू हातेघर धरण
जावळी तालुक्यात कुडाळी नदीवर हा प्रकल्प आहे. जावळी तालुक्यातील ८ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताखाली आणले जाणार आहे. प्रकल्पासाठी २४.६० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे. १९९५ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा त्याची मूळ किंमत ६३.४७ कोटी होती. आता ती वाढून ६३५ कोटी रुपयांवर गेली आहे. धरणातून पाईपलाईनने पाणी शेतीला देण्यात येणार आहे.
................
वांग मराठवाडी
पाटण तालुक्यातील या प्रकल्पाला १९९३/९४ मध्ये मान्यता मिळाली. तालुक्यातील ८ हजार ७४२ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पातून सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पासाठी ५३८ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले. १९९३ मध्ये प्रकल्पाची मूळ किंमत ८१.४७ कोटी होती. आता तीच वाढून ५९४ कोटी रुपये झालेली आहे. केटीवेअर बंधारे बांधून हे पाणी उचलण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अजून सुटलेला नाही.
...............
जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, या हेतूने आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांना सूचना केल्या जात आहेत. याबाबत कार्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.
- प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता
...............
जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत, अशी शेतकरी इच्छा व्यक्त करत आहेत. अनेक वर्षे जर प्रकल्प रखडला, तर त्याची किंमत देखील वाढते. ही कामे वेगाने व्हावीत.
- संभाजी कदम, शेतकरी
.............
जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प रखडलेल्या स्थितीत आहेत. या प्रकल्पांना जर योग्यप्रकारे हाताळले, तरच ती कामे पूर्ण होतील. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नदेखील मार्गी लावला पाहिजे.
- चैतन्य दळवी, शेतकरी
....................
स्थानिक जनतेने प्रकल्प पूर्ण होईल म्हणून जमिनी दिल्या आहेत. संपूर्ण एक पिढी प्रकल्प पूर्ण होईल म्हणून वाट पाहत होती. आता ती हयात राहिलेली नाही. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. शासनाने प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देऊ नये.
- शशिकांत चव्हाण, शेेतकरी
फोटो नेम : ०४महू
फोटो ओळ :
कुडाळी नदीवरील महू धरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम अनेकदा थांबते, निधी मिळाला की सुरू होते, अशी स्थिती आहे. तुलनेने छोट्या असलेल्या प्रकल्पाला आता २६ वर्षे पूर्ण झालेली आहेत.