सातारा : येथील जिजामाता सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासकीय इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महिनाभरात ठेवी मिळाल्या नाहीत तर बँकेच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बँकेचे ठेवीदार दिवंगत रमेश चोरगे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. गैरव्यवहाराचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने जिजामाता सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. दि.१0 जुलै २0१५ रोजी हे निर्बंध घातले होते, मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ठेवीदारांचे भवितव्य अधांतरी आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या ठेवीदारांनी प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात येऊन याचा जाब विचारला. मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनी आदेश काढूनही गेल्या ४ महिन्यांपासून फौजदारी कारवाई झालेली नसल्याचे आंदोलक ठेवीदार डॉ. वाय. एच. संगही यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी बँकेतील गुंतवली होती. आता त्यांना महिन्याकाठी मिळणारे व्याजही बंद झाली असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेत १0५ कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असून, ८0 हजार ठेवीदार १ लाखांच्यापुढे ठेवी असणारे आहेत, ठेवीदारांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ठेवीदार बँकेत हेलपाटे घालून परत जात आहेत, सहकार विभागाकडूनही कोणतेच उत्तर मिळत नाही. त्यामुळे ठेवीदारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एका महिन्याच्या आत काय तो निर्णय घ्यावा, आणि ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, अशी मागणी करत ठेवीदारांनी मोर्चाही काढला. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
‘जिजामाता’च्या संतप्त ठेवीदारांचा धडक मोर्चा
By admin | Published: December 07, 2015 10:11 PM