सातारा : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येथील जिजामाता सहकारी बँकेच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेलाही काही दिवसांपासून खो बसला आहे. कऱ्हाड अर्बन बँकेने दि. २६ नोव्हेंबर रोजी ड्यू डिलिजन आॅडिटच्या अनुषंगाने जिजामाता बँक प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र, ठेवीदार रमेश चोरगे यांच्या आत्महत्येनंतर ही प्रक्रियाही ठप्प झाली आहे. बँकेचे विलीनीकरण करून अथवा अवसायनात काढून हे दोन मार्ग सध्या कोंडी फोडण्यासाठी उरले आहेत. जिजामाता सहकारी बँकेच्या संचालकांवर एकावर एक गुन्हे दाखल होत असल्याने हे प्रकरण आणखी चिघळू लागले आहे. कऱ्हाड अर्बन बँक ही जिजामाता महिला सहकारी बँक चालविण्यासाठी घेणार, अशी चर्चा मधल्या काळात होती. त्यादृष्टीने कऱ्हाड अर्बन बँकेतर्फे ड्यू डिलिजन आॅडिटसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जिजामाता बँकेच्या प्रशासनाला दिली होती. मात्र, अद्याप त्याची माहिती मिळाली नसल्याने विलिनीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. दरम्यान, सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनीही लेखापरीक्षण सुरू केले होते. मात्र, त्यातही दफ्तर मिळाले नसल्याने अडचणी आल्याचे सहकार निबंधक कार्यालयातर्फे सांगण्यात येते. आता जिजामाता बँकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सहकार आयुक्त कार्यालय व रिझर्व्ह बँक या दोन संस्था यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, जिजामाता बँकेच्या कारभारमुळे ठेवीदारांची झोप उडाली आहे. ठेवी अडकल्यामुळे ठेवीदार अस्वस्थ झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एक लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा महामंडळाकडून संरक्षण दिले गेले असल्याने जवळपास ९२ टक्के म्हणजे ८७ कोटी रुपयांच्या ठेवी सुरक्षित असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
जिजामाता सहकारी बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया रखडली
By admin | Published: December 13, 2015 1:02 AM