सातारा : जिजामाता बँकेचे ठेवीदार रमेश चोरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर आणि शिरीष कुलकर्णींचा एकीकडे पोलीस शोध घेत असताना दुसरीकडे मात्र अॅड. माडगूळकर यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पोलीस अधीक्षकांकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चोरगे यांच्या सर्व ठेवी बँकेने परत केल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड. माडगूळकर सक्रिय असताना पोलिसांना त्या कशा सापडत नाहीत, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.अॅड. वर्षा माडगूळकर आणि शिरीष कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी त्यांना अद्याप अटक झाली नाही. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानकडे धाव घेतली; मात्र त्यांच्या घराला कुलूप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अटकपूर्व जामिनासाठीही अॅड. माडगूळकरांकडून हालचाली सुरू असण्याची शक्यता असल्याने यावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा रीतीने रविवारी दिवसभर माडगूळकरांचा पोलीस शोध घेत असताना व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपवर चक्क त्यांनी या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘बँकेविरुद्ध अथवा माझ्याविरुद्ध कोणतीही चौकशी पूर्ण झालेली नाही. तसेच कोणताही गुन्हा आजपर्यंत संस्थेविरुद्ध दाखल झालेला नाही. चोरगे यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, अपघाती आहे, आत्महत्या की खून आहे, याची सखोल चौकशी व्हावी,’ असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. आपल्याला अन् आपल्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे पोलिसांना आपण एसएमएस करुन कळविले आहे. तसेच बँकेवरील कारवाईसुद्धा अन्यायकारक असल्याने बँकेला संरक्षण द्यावे, असे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सुचविले आहे, याचा उल्लेखही निवेदनात आढळतो. (प्रतिनिधी)पालकमंत्रीही ग्रुप मेंबरज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड. माडगूळकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्या ग्रुपमध्ये अनेक उच्चपदस्थांचा समावेश असून, खुद्द पालकमंत्री विजय शिवतारे या ग्रुपचे मेंबर असल्याची माहिती पुढे आली आहे. तपास सुरू असताना हजर होऊन पोलिसांना सहकार्य न करता व्हॉट््सअॅपवर ‘प्रकट’ होण्याच्या या क्लृप्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.निवेदन माध्यमांकडे पोहोच...रविवारी दिवसभर व्हॉट््सअॅपवर दिसणाऱ्या निवेदनाची प्रत सायंकाळी माध्यमांना पोहोच करण्यात आली. निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना दिल्याचा उल्लेख यात केला असून, चोरगे वारंवार बँकेत येऊन दमदाटी व असभ्य भाषेत शिवीगाळ करीत असत, असा उल्लेखही निवेदनात आढळतो. आपल्यालाही खुनाच्या धमक्या वारंवार येत असल्याची तक्रार अॅड. माडगूळकर यांनी केली आहे.
‘जिजामाता’चे गायब पदाधिकारी व्हॉट्सअॅपवर!
By admin | Published: December 06, 2015 10:39 PM