सातारा : गेल्या पाच वर्षांपासून जिजामाता महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना अद्याप ठेवी परत मिळाल्या नाहीत. यातील बरेच ठेवीदार हे वयस्कर असून, हे सर्वजण वैफल्यगस्त झाले आहेत. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकटात सर्वजण सापडले आहेत. यामुळे या ठेवी परत मिळण्यासाठी १५ जुलैपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेत आम्हा ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. ठेवीदारांपैकी बहुतेकजण वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी वृद्धापकाळाची आर्थिक तरतूद म्हणून बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. त्यातच सध्याचे कोरोना संकट उद्भभवले. त्यामुळे आम्ही सर्वजण हतबल व वैफल्यग्रस्त झालेलो आहोत. काही ठेवीदारांचा तर मनोबल खचल्याने मृत्यू झालेला आहे. आमची बिकट झालेली असून अजून काही अनर्थ घडण्यापूर्वी सहकार खाते, राज्य शासन, रिझर्व्ह बॅंकेने आम्हा ठेवीदारांना रक्कम व्याजासह परत देण्यास सांगावे. अन्यथा १५ जुलैपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा ठेवीदार व कर्जदार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कदम यांनी दिला आहे.