लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान अमूल्य असे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातारा जिल्ह्यातील चार गावांमध्ये ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोखा सन्मान करण्यात आला. गावातील प्रत्येक घरावर ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली.
आज देशात अत्याचारांच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. हिंसा, ढासळलेली नैतिकता, नीतिमूल्यांचा आणि संस्कार संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. आज हे विदारक चित्र दररोज कुठे ना कुठे तरी वाचण्यात, ऐकण्यात, पाहण्यात येतंच असतं. तेव्हा मनांत एक वादळं उठतं आणि आपोआप मुखातून शब्द बाहेर येतात ‘महाराज तुम्ही परत या’. खरोखरच छत्रपती शिवरायांना परत आणायचं असेल तर आपल्याला अगोदर जिजाऊंचा त्यांच्या लेकींचा सन्मान करायला हवा. याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायला हवी. आपल्या मुलींमध्ये आपल्याला ‘जिजाऊं’ना पाहायला हवं. कारण तिच्यातच नवनिमार्णाचं सामर्थ्य आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जयहिंद फाऊंडेशनने जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘चला जिजाऊ घडवूया’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
वाई तालुक्यातील अनपटवाडी व गुळूंब, जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी, तर खटाव तालुक्यातील डिस्कळ या गावात ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. येथील घरोघरी ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश तर ज्या घरात मुलगा आहे त्या घरावर ‘स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा, मुलाचे नाव व चला विवेकानंद घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली. जयहिंद फाऊंडेशनचे सचिव हणुमंत मांढरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विशेष बाब म्हणजे फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीगोंदा येथील मंगल नांगरे यांनी २६२ अंगणवाडी केंद्रात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
(कोट)
या उपक्रमामुळे मुली, तसेच पालकांच्या मनात नव प्रेरणा निर्माण झाली आहे. प्रत्येक घरावर मुलगी व मुलाच्या नावाची पाटी झळकली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार मनामनांत व घराघरांत रुजविण्याचे प्रयत्न जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत.
- उमेश मोरे, मुख्याध्यापक
दुदुस्करवाडी प्राथमिक शाळा,
(कोट)
प्रत्येक मुलीने राजमाता जिजाऊ व मुलाने स्वामी विवेकानंद बनण्याची गरज आहे. आज त्यांच्याच विचाराची समाजाला गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये परिवर्तनाचे बीज रुजवायला हवेत. तरच समाजाचा, आपला उत्कृर्ष होईल.
- संस्कृती दळवी, डिस्कळ
फोटो : १३ जिजाऊ ०१/०२
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जावळी तालुक्यातील दुदुरस्करवाडी व खटाव तालुक्यांतील डिस्कळ येथील घरांवर ‘मुलीचे नाव असलेली व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश देणारी पाटी लावण्यात आली आहे.