लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उकाड्याने शरीराची लाहीलाही होत असताना शहर परिसरातील शेतकऱ्यांनी यातून रोजगार निर्मिती केली आहे. सातारा कोंडवे रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी रसवंती गृहे थाटून यातून व्यवसाय निर्मिती केली आहे.
सातारा शहर व आजूबाजूच्या उपनगरांत पन्नासहून अधिक रसवंती गृहे पाहावयास मिळतात. यंदा मार्च महिन्यामध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले आहे.
सातारा शहर सोडून महाबळेश्वरच्या दिशेने निघाले की या मार्गावर अनेक रसवंती गृहे दिसतात. प्रत्येक ठिकाणी रसवंती गृहांवर गर्दी दिसते. उकाड्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. विशेष म्हणजे, कोंडवे येथील शेतकऱ्यांनी लाकडी चरक बसविले आहेत. तिथे बैल लाकडी चरक ओढताना दिसतो. कोंडवे येथील प्रकाश सरडे यांनी अशा प्रकारचा चरक बसविला आहे. त्यामुळे रस काढण्याचे काम सोपे होते. ग्राहकसुद्धा टकमक या बैलाकडे व लाकडी चरकाकडे पाहत बसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस आरोग्याला चांगला असतो; त्यामुळे अन्य शीतपेये पिण्यापेक्षा नागरिक उसाच्या रसाला प्राधान्य देतात.
या रस्त्यावरून जाणारे प्रवासी रोज साधारणत: ५०० लिटर उसाचा रस फस्त करतात. एका दिवसाचा एका व्यावसायिकाचा गल्ला हजार रुपयांच्या पुढे असतो, असे येथील व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)
उन्हाळा सुरू होताच आम्ही हा लाकडी चरक बैलासकट घेऊन मेढा-महाबळेश्वर रस्त्याला रानात लावतो. दोन-तीन महिन्यांच्या या कालावधीत रसवंती गृहात चांगला मोबदला मिळतो. घरात हातभार लागतो.
- प्रकाश मतकर, कोंडवे
आम्ही गेली दोन-तीन वर्षे सतत उन्हाळा लागला की या रसवंती गृहात थांबतो. आकर्षण म्हणजे बैलाच्या साह्याने रस काढून दिला जातो. यासाठी शहरी भागातील ग्राहकांची संख्या वाढती आहे.
- वनिता शिंगटे, गोगावलेवाडी
..............