सातारा : कास धरण प्रकल्प हा सातारा शहर आणि कास परिसरातील १५ गावांसाठी महत्त्वाचा आहे. धरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून, हा प्रकल्प १५ मे पर्यंत मार्गी लावावा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन कास धरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा शहर आणि कास मार्गावरील सुमारे १५ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी हा प्रकल्प मार्गी लावणे अत्यावश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला आणि त्यांच्याचमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा ५७.९१ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धरणाची उर्वरित कामे दर्जेदार करून ती वेळेत पूर्ण करा आणि या भव्यदिव्य प्रकल्पाला साताराकरांच्या सेवेत लवकर रुजू करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
फोटो : २१ कास डॅम
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कास धरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला.