वाठार स्टेशन : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरूस्ती व्हावी व मार्ग वाहतुकीयोग्य करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुण्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आदर्की फाटा ते वाढे फाटामध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे लोणंद परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. खासदार श्रीनिवास पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती. त्याचबरोबर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून लोणंद ते आदर्की फाटा रस्ता मजबुतीकरण कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
त्यानुसार निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत आहे. या कामासाठी निधी मंजूर झाल्याने खराब झालेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळण सोयीचे होणार आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\