सातारा, 2 : ‘रवळीनाथाच्या नावानं चांगभलं...’, ‘नाथाच्या घोड्याच्या नावानं चांगभलं...’ अशा जयघोषात परळीचे ग्रामदैवत असलेल्या श्री रवळीनाथाची यात्रा उत्साहात पार पडली.
यात्रेनिमित्त परळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज पहाटे मूर्तीस दुग्धाभिषेक, आरती, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम झाले.
यात्रेच्या मुख्यदिवशी दसºयाला पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा झाली. त्यानंतर भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारच्या श्री काडसिद्धेश्वर भजनी मंडळ कुस बुद्रुक यांचे भजन झाले.
मंदिरात महाआरती झाल्यानंतर फुलांनी सजलविलेली पालखी पाच प्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर काढण्यात आली. गुलाल खोबºयाची उधळण करत आणि रवळीनाथाच्या नावानं चांगभलंचा जयभोष करत मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर पालखी गावात नेली. पालखी मार्गावर प्रत्येकाच्या दारात सडा, रांगोळी घालण्यात आली होती. दारोदारी औक्षण करण्यात आले.
यात्रेसाठी खानापूर, मंगरुळ, सांगली, पुणे, मुंबई, पुनर्वसीत अतीत, खोडत, समर्थगाव, गुरसाळे आदी भागातून भाविक आले होते. येणाºया सर्व भक्तांसाठी परळी ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.