ओगलेवाडी
सैदापूर व विद्यानगरीतील अनेक अंतर्गत रस्त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. नवीन झालेले सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रीटने बनविले आहेत. या दर्जेदार रस्त्यामुळे आता पुढील अनेक वर्षे यावर खड्डे पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता सैदापूर गावाची वाटचाल खड्डे मुक्त गावाच्या दिशेने सुरू झाली आहे.
झपाट्याने विकसित होणारे कराड परिसरातील गाव म्हणून सैदापूर गावाची ओळख आहे. मात्र, नियोजनाअभावी आणि भविष्याचा वेध घेता आला नसल्याने येथील रस्त्याची अवस्था खूप खराब होती. मात्र, १४ व्या वित्त आयोगातून आणि लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत निधीतून मागील पाच वर्षांत येथे झालेली कामे ही दर्जेदार होऊ लागली आणि समस्यांचा निपटारा होऊ लागला. यातील नजरेत भरणारे काम म्हणजे अंतर्गत रस्ते.
पावसाळ्यात विद्यानगरीतील रस्ते म्हणजे विचारू नका अशी अवस्था होती. याच रस्त्यामुळे अनेक जण घर घेताना इतर गावाला पसंती देत होते. मात्र, मागील काही दिवसांत या समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले आणि रस्ते बांधताना येथील भौगोलिक जमिनीचा विचार करून डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंटमध्ये रस्ते बांधण्याला प्राधान्य दिले गेले. बघता बघता विद्यानगरीतील रस्ते तयार होऊ लागले आणि या गावाचा कायापालट होऊ लागला. ज्याठिकाणी पाणी साठून रस्ता खराब होतो त्याच ठिकाणी पक्के रस्ते बांधून योग्य पसंतीक्रम लावला गेला. आज गावातील बहुतेक रस्ते पूर्ण झाले आहेत. उर्वरित रस्ते पूर्ण करण्यासाठी नूतन सरपंच फत्तेसिंह जाधव आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. यामुळेच लवकर या गावाची वाटचाल खड्डेमुक्त गावाकडे होईल आणि २१ व्या शतकातील सैदापूर साकारले जाईल.
चौकट
नव्या युगाला सामोरे जाणारे सैदापूर बनवण्यासाठी प्रयत्नशील
सिमेंट रस्ते, सौर ऊर्जा वापर, नवीन प्रशासकीय इमारत, २४ बाय ७ योजना अशा अनेक योजना यशस्वीरीत्या पूर्ण करीत आहोत. नागरी समस्या कमी करून लोकांना चांगल्या नागरी सुविधा निर्माण करून नव्या युगाला सामोरे जाणारे २१ व्या शतकातील सैदापूर बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
फत्तेसिंह जाधव,
सरपंच सैदापूर, ता. कराड.