फलटण : फलटणनगर पालिकेच्या राजधानी टॉवरमधील गाळा क्रमांक १ आणि २ चे बांधकाम आणि पायऱ्या बेकायदेशीर पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. ते अतिक्रमण हटवून नकाशाप्रमाने तत्काळ बांधकाम होणे आवश्यक असल्याची मागणी करूनही नगरपालिका राजकीय दबावाखाली कारवाई करण्याचे टाळत आहे. हे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी दि १ जून रोजी सर्व विरोधी आघाडीचे नगरसेवक नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन धरणार असल्याचा इशारा नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पालिकेला दिला आहे.
याबाबत नुकतेच पालिका प्रशासन, उपविभागीय अधिकारी आणि शहर पोलीस स्टेशनला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या शेजारी नगरपालिकेने बांधलेल्या राजधानी टॉवर्समध्ये गाळा नंबर १ व २ मध्ये गाळेधारकांनी नकाशाप्रमाणे बांधकाम असताना त्यात बेकायदेशीर बदल करून भिंत पाडली आहे तसेच रस्त्याच्याकडेला पायऱ्या बांधून अतिक्रमण केले आहे, हे अतिक्रमण तातडीने न काढल्यास दि. १ जूनला नगरपालिकेचे समोर सर्व विरोधी नगरसेवकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा अशोकराव जाधव यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे व सहकारी उपस्थित होते.