महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरात अरुंद रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मोऱ्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे पाचगणी-महाबळेश्वर या रस्त्यावरील वाहतूक नाकिंदा-अवकाळी मार्गे वळविण्यात आली होती. अरुंद व एकेरी रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक पर्यटकांनी जंगलची सफारी तर अनुभवलीच याशिवाय वाहतूक पूर्ववत होईपर्यंत अनेकांनी रानमेव्याचा आस्वादही घेतला.महाबळेश्वरमधून पाचगणीकडे व पाचगणी कडून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही तास रस्ता बंद ठेवण्यात आला होता. यामुळे वेण्णा लेक लिंगमळा परिसरातून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अशीच परिस्थिती नाकिंदा गावात होती. अवकाळी बसथांब्यापासून बोंडारवाडी या गावांच्या हद्दीपर्यंत भली मोठी रांग लागली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात एसटी बसचे प्रमाण जास्त होते. स्थानिक नागरिक, शाळकरी मुले, पर्यटक, टॅक्सी व्यावसायिक यांना मोठा पटका बसला. शाळकरी मुलांना नाकिंदा बसथांब्यापासून चालत जावे लागले. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग वळविण्यात आला. हा रस्ता अरुंद व जंगल असल्यामुळे या हौशी पर्यटकांनी जंगल सफारी अनुभवली तर काही पर्यटक जंगलमधील रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत होते. (प्रतिनिधी)महाबळेश्वरला कोकणचा टच !पाचगणीपासून ठिकठिकाणी वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी मोरी घालणे, साईटपट्टा, रिफ्लेक्टर डांबरीकरण करून रस्ते कोकण पद्धतीने बनविले असल्यामुळे या एप्रिल व मे महिन्यांच्या हंगामात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ऐन हंगामात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने वाहनधारक व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाबळेश्वरात पर्यटकांनी अनुभवली जंगलची सफारी
By admin | Published: April 12, 2017 10:48 PM