सातारा : सिंचन विहिरीच्या अकुशल कामाच्या प्रस्तावाची बिले वरिष्ठांना मंजुरीसाठी सादर करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक कांताराम धोंडू हांडे (वय ३६, सध्या रा. गोडोली, मूळ रा. मोराशी, आंबेवाडी पोस्ट शिरगाव, ता. खेड जि. पुणे) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नागठाणे येथील एका शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे. या कामाची बिले वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी हांडे याने संबंधित शेतकऱ्याकडे पाच हजारांची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार नोंदविली. शनिवारी दुपारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सापळा लावला. हांडे हा समितीच्या आवारातील चहाच्या टपरीवर आला असता त्याने संबंधित शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे, आरिफा मुल्ला, संभाजी बनसोडे, तेजपाल शिंदे, अजित कर्णे, विशाल जगताप, प्रशांत ताटे, विनोद राजे, संभाजी काटकर यांनी केली. (प्रतिनिधी)
कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
By admin | Published: October 15, 2016 11:42 PM