सातारा : ‘काम काँग्रेसने करायचे आणि फळे राष्ट्रवादीने चाखायची. हे आता बंद झाले पाहिजे. आमचा आघाडीस विरोध आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकदा होऊन जाऊ द्या,’ अशी मागणी करत सातारा जिल्ह्यातील काँग्रेसजण राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच ही मागणी झाल्यामुळे काँग्रेसची निवडणूक समितीही थोडावेळ अवाक झाली. दरम्यान, काँग्रेसकडून ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाहीदेखील या इच्छुकांनी दिली.विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यानुसार काँग्रेसने त्यांच्याकडे असणाऱ्या १७४ जागांवर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती गेल्या आठवड्यात घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीकडून जास्त जागांची होणारी मागणी लक्षात घेता उर्वरित ११४ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतीही काँग्रेसने घेतल्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तेरा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आणि प्रत्येकांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे लढण्याची मागणी केली.सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ असून यापैकी कऱ्हाड उत्तरमधून धैर्यशील कदम, विकास पाटील-शिरगावकर, अविनाश नलवडे तर कोरेगावातून किरण बर्गे, विजय कणसे आणि अविनाश फाळके यांनी मुलाखती दिल्या. पाटणमधून राहुल चव्हाण, हिंदुराव पाटील इच्छुक असून त्यांनीही काँग्रेस निवड समितीसमोर आपली भूमिका मांडली. फलटणमधून दिगंबर आगवणे आणि बाळासाहेब शिरसाट यांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येकांनी मुलाखतीदरम्यान, वेगवेगळे लढण्याची मागणी केली.काँग्रेसच्या निवड समितीने मुलाखतीदरम्यान, मतदारसंघातील सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर आपण लढला तर काय होऊ शकते, याची विचारणाही केली. यानंतर इच्छुकांनी आपापल्या मतदार संघाचा आढावा अगदी थोडक्यात मांडला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकदा होऊन जाऊ द्या,’ अशी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीकडे मतदार संघ गेला तर..?महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आणि आपण जो मतदार संघ मागितला आहे तो राष्ट्रवादीकडे गेला तर काय चित्र राहिल, याबाबतही काँग्रेसच्या इच्छुकांना विचारणा करण्यात आली. मात्र, प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्याच्या मागणीवर ठाम होते. आघाडी झाली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करण्याची मानसिकता नाही, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती करण्यात आली. आपणच अशी भूमिका घेतली तर जिल्ह्यातून काँग्रेसचा हाताचा पंजा दिसणार नाही, अशी भीतीही समितीपुढे व्यक्त करण्यात आली.माण, वाईतून कोणीच नाही...सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून यापैकी माण, वाई आणि कऱ्हाड दक्षिण या तीन मतदारसंघातून मुलाखतीसाठी कोणीच नव्हते. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघाचे आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मागणी अर्ज भरला असला तरी मुलाखतीला जाणे त्यांनी पसंत केलेले नाही. वाईतून तर ‘मुख्यमंत्र्यानीच या ठिकाणी लढावे,’ अशी मागणी केली गेली आहे. येथील काँग्रेसचे नेते मदन भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. येथून मुंबईला मुलाखतीसाठी कोणीच गेले नसल्यामुळे वाईत आता काँग्रेसचा नेता कोण, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.कोरेगाव विधानसभा मतदार संघाची सद्याची राजकीय परिस्थिती निवड समितीसमोर प्रामाणिकपणे मांडली. आघाडी न करता वेगळे लढलो तर कोरेगाव मतदार संघातून काँग्रेसला निश्चित यश मिळेल. आघाडी झाली तर काँग्रेसची मंडळी काम करणार नाही, असे आम्ही त्यांना ठामपणे सांगितले आहे.- विजय कणसे, कोरेगावफलटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विरोधात लाट असून आम्ही त्याची मुद्देसूद मांडणी निवड समितीसमोर केली आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याचेच काँग्रेसच्या फायद्याचे असल्याची आमची भूमिका आम्ही मांडली आहे. वातावरण पोषक असताना आघाडी नकोच, अशी मागणी केली.- बाळासाहेब शिरसाट, फलटणउमेदवारीच्या अनुषंगाने आम्हाला मत मांडण्यास सांगण्यात आले. आम्ही आमची भूमिका मांडली. १९९९ ची निवडणूक भावनिक असल्यामुळे ते चित्र वेगळे होते, असे ठामपणे सांगितले. पाटणमध्ये काँग्रेसचे संघटन चांगले आहे. मुख्यमंत्रीही आपल्याच तालुक्यातील आहेत. त्यामुळे आम्ही उमेदवारीवर ठाम आहे. - हिंदुराव पाटील, पाटण
एकदाचं होऊनच जाऊ द्या !-- खटक्यावर बोट...
By admin | Published: September 01, 2014 10:28 PM