मसूर : कवठे (मसूर) येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंगाची यात्रा ८ व ९ मे रोजी होणार होती. ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत पदधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उंब्रजचेे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सर्कल के. टी. वाघमारे, कवठेचे लोकनियक्त सरपंच लालासाहेब पाटील, कवठेचे उपसरपंच गणेश घार्गे, ग्रामसेवक संदीप निकम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबराव यादव, पोलीस पाटील मारुती यादव उपस्थित होते.
यावेळी गोरड म्हणाले, ‘यात्रेदिवशी धार्मिक विधी पुजारी करतील. त्यानंतर मंदिर बंद करतील. या दिवशी दर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच पालखी मिरवणूक काढण्यात येऊ नये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. वाढणारी रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभागावर ताण येत आहे. त्यामुळे गावातील ४५ वर्षांवरील व्यक्तींची लसीकरणाची यादी तयार करा. गावातच लसीकरण शिबिर घ्या म्हणजे आरोग्य केंद्रावर गर्दी होणार नाही. तसेच यात्रेच्या अनुषंगाने कोणीही कार्यक्रमाचे आयोजन करू नये. गावातील भाविकांना ‘श्री’चे दर्शनास बंदी घातली आहे.
यावेळी दोन्ही गावांच्या वतीने बाहेरगावचे माहेरवाशीण, पै पाहुणे यांना यात्रेसाठी बोलवू नये, असे सर्वानुमते ठरले. यातूनही कोणी नियमाचे पालन न करता पाहुणे बोलवले तर ज्यांच्या घरी पाहुणे येतील त्यांना ग्रामपंचायतीने आकारलेल्या एक हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागेल. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
कोरोना महामारीचा प्रसार होऊ नये म्हणूनच यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अधिकराव यादव, दीपक यादव, अशोक किरत, विलासराव माने, शशिकांत शेलार, धनाजी पाटोळे, विशाल यादव, हिरामण साळुंखे, विनोद यादव, अधिक पुजारी उपस्थित होते. कवठेचे उपसरपंच गणेश घार्गे यांनी आभार मानले.