क-हाड ( सातारा ): येथील कृष्णा वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुण पैलवान नीलेश विठ्ठल कुरूंदकर यांच्या कुटुंबीयाला धीर देण्यासाठी क-हाड तालुक्यातील पैलवान सरसावले आहेत. अनेक पैलवानांनी प्रत्यक्ष भेटून किंवा भ्रमणध्वनीवरून त्यांना धीर दिला आहे. तर नीलेश कुरूंदकर लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना सारेच करताना दिसत आहेत.कोल्हापूर जिल्ह्णातील बांदिवडे येथे जोतिबाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात मंगळवारी कुस्ती खेळताना वीस वर्षांचा तरुण रांगडा पैलवान प्रतिस्पर्धी पैलवानाकडून डावपेचादरम्यान जमिनीवर निपचित पडला आणि मैदानामध्ये उपस्थित शौकिनांच्या काळजाचा ठोका चुकला.जखमी पैलवान नीलेशला उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रुग्णवाहिकेतून नेत असताना त्याची प्रकृती खालावल्याने त्याला क-हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ही बातमी बुधवारी दिवसभर पैलवान वर्तुळात वाºयासारखी पसरली आणि अनेक पैलवानांनी रुग्णालयाकडे धाव घेत वडील विठ्ठल कुरूंदकर, भाऊ सुहास कुरूंदकर यांना भेटून कुटुंबीयाला धीर दिला. यात मुंबई महापौर केसरी संग्राम पोळ यांच्यासह अनेक मातब्बरांनी रुग्णालयात जाऊन कुरूंदकर परिवाराची विचारपूस केली.नीलेशवर झालेल्या या आघाताने संपूर्ण परिवारावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. त्याबरोबरच कुस्तीवर प्रेम करणारी मंडळीही येथे भेटायला येत आहेत.काही महिन्यांपूर्वी कुस्ती मैदान आटपून कुंडलकडे चाललेल्या पैलवानांच्या चारचाकी गाडीला कडेगाव तालुक्यात अपघात झाला आणि त्यात अनेक पैलवान जखमी तर काहींचे दु:खद निधन झाले. या हृदय पिळवटून टाकणाºया घटनेमुळे कुस्तीक्षेत्रात शोककळा पसरली होती. आता तर कुस्ती मैदानात खेळता खेळता झालेल्या डावपेचात जखमी झालेला पैलवान नीलेश मृत्यूशी झुंज देत असल्याने कुस्तीप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकत आहे.