सागर चव्हाण पेट्री : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कास तलाव परिसरात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा पाहता तलाव कचऱ्याच्या विळख्यात पडलेला पाहायला मिळत आहे. पर्यटनस्थळी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी निराशा व्यक्त करत आहेत.मद्याच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून, ठिकठिकाणी चुली माडण्यात आल्या आहेत. पर्यटक ठिकठिकाणी व्हेज, नॉनव्हेज पार्ट्या झोडत असून, होणारा कचरा त्याच ठिकाणी टाकत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊन भविष्यात कास तलावाचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कासच्या सौंदर्याची भुरळ जिल्हा-परजिल्ह्यातील पर्यटकांना पडलेली आहे. पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून कास तलाव स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. सध्या कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत असून, वाढत चाललेल्या अस्वच्छपणामुळे पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून नाराजीचे सूर उमटत आहेत.पोलिसांची नजर असणे अत्यावश्यक तलाव परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पाहता राजरोसपणे मद्यपान होत असल्याचे चित्र आहे. डोक्यात नशा ठेवून चेष्टामस्करीचे रुपांतर भांडणात होऊन कोणतीही विपरीत घटना घडू नये, यासाठी पोलिसांची कायम करडी नजर असणे अत्यावश्यक आहे.
कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 3:52 PM