सातारा : इनोव्हा गाडीच्या समोर गाडी आडवी मारून आम्ही फायनान्सची माणसे आहोत, असे म्हणून कागलच्या युवकाला जबरदस्तीने स्थानबद्ध करून ठेवले. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री नऊ साडेनऊ वाजता साताऱ्यातील निसर्ग ढाब्याजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.आशिष मधुकर सकटे, तानाजी भिसे, गणेश सूर्यकांत नवसरे, गुरू राजेंद्र ढाणे (सर्व रा. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनय बाजीराव मगदूम (वय २५, रा. सिद्धनेली, ता.कागल, जि. कोल्हापूर) हा रविवारी रात्री काही कामानिमित्त कागलहून, मुंबईला इनोव्हा कारने निघाला होता. त्यावेळी महामार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ अचानक एका कारने त्याच्या गाडीला समोर गाडी आडवी लावली.कारमधून चौघे युवक उतरले. ‘आम्ही फायनान्सचे माणसे आहोत. तुमच्या गाडीचा हफ्ता राहिलेला आहे,’ असे म्हणून त्याला आरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. तसेच जोर जबरदस्तीने विनय मगदूम याला स्थानबद्ध करून ठेवले.या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. विनय मगदूम याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यातही घेतले.
कागलच्या युवकाला जबरदस्तीने केले स्थानबद्ध, सातारा पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:14 PM