कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसला असला तरी राजकीय चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत़ कऱ्हाड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी पराभवानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन चौफेर टीका केली़ त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण गटात चुळबूळ सुरू झाली आहे़ कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ विलासराव पाटील-उंडाळकरांनी या मतदार संघातून विजयाची सप्तपदी पूर्ण केलेली; पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून बंडखोरी करणाऱ्या उंडाळकरांचा पराभव झाला़ पराभवानंतर उंडाळकर प्रथमच साताऱ्यात प्रसिद्धी माध्यमांशी बोलले. ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणेत पैशाचा पाऊस पडला, मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला, आदी आरोप तर केलेच; पण मला व माझ्या कुटुंबाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला अन् हे षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा उंडाळरांनी दिला़ साहजिकच त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण समर्थकांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी) बाबा काय बोलणार ? निवडणूक प्रचारादरम्यानही पृथ्वीराज चव्हाणांवर उंडाळकरांसह अतुल भोसले अन् भाजपच्या नेत्यांनी कऱ्हाडात येऊन टीका केली़ मात्र, स्थानिकांच्या टीकेला चव्हाणांनी कधीच उत्तर दिले नाही़ अन् त्यांच्यावर टीकाही केली नाही़ मात्र, निवडणुकीनंतर उंडाळकरांनी प्रथमच चव्हाणांवर तोफ डागली आहे़ याला रविवारी कऱ्हाड मुक्कामी असणारे पृथ्वीराज चव्हाण उत्तर देणार का ? याची चर्चा आहे़ राजकारणात चढउतार नेहमीच असतात़ काँग्रेसचे माजी आमदार उंडाळकरांनी कऱ्हाड दक्षिण मतदार संघाबरोबर जिल्ह्याच्या राजकारणावर आपला प्रभाव ठेवला़ सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही जिल्हा बँकेवर त्यांनी वर्चस्व ठेवले़ सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत ते स्वत: निवडून आले; पण त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला़ कऱ्हाड बाजार समिती निवडणुकीतही त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला़ राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीला लोकसभा निवडणुकीत यशवंतराव माहितेंकडून त्यांचा पराभव झाला़ त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सलग सात वेळा ते निवडून आले आणि आठव्यांदा त्यांचा पराभव झाला़ राज्यात काडीमोड घेतला असताना कऱ्हाडात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची छुपी युती झाली़ मला राष्ट्रवादीची मदत झाली नाही, असे सांगत त्यांनी उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला़ ‘समझनेवालोंको इशारा काफी होता है,’ त्यामुळे बाळासाहेब यावर काही प्रतिक्रिया देणार का ? हेही पाहणे महत्त्वाचे बनले आहे़
‘काकां’च्या आरोपामुळे ‘बाबा’ गटात चुळबूळ ! काँग्रेसअंतर्गत धुसफूस :
By admin | Published: November 17, 2014 10:11 PM