सातारा : शिवेंद्रराजे यांच्यासाठी मी काकींचा मारही खाल्ला आहे. त्यांनी मोठं व्हावं, जिल्ह्याचं पहावं अन् राज्याचेही पहावं. त्यासाठी लागेल ती मदत करायला तयार असल्याचे उद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भेट दिली. यावेळी त्यांनी कोण काय प्रश्न विचारणार ते मला माहीत आहे, असे सांगत ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लहानणीच्या आठवणी जागवताना खूप मोठी व्हावं, जिल्ह्याचे बघावं अन् राज्याचंही बघावं. त्यासाठी जे काही लागेल ते मी करायला तयार असल्याचे सांगितले.खा. उदयनराजे म्हणाले, घरात आ. शिवेंद्रसिंराजे यांचे अनेक फोटो पाहिले. फक्त एक चुकलंय. चेहऱ्यावर थोडं हास्य असते तर बरं झाले असते. आता मी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. त्यामुळे आत्ताच फोटो काढा अन् त्याचे मी बॅनर लावेन, असे सांगत कोपरखळी मारली.
आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राजकारण वेगळे आणि घराचे विषय वेगळे असतात. आमचे राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या खासदार उदयनराजे यांचे आशीर्वाद दहा हत्तींचे बळ देणारे आहेत. निवडणुकीत भाजपच्या वतीने उदयनराजे यांच्या कायम सोबत राहणार आहेत. दिल्लीतील वरिष्ठांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब व्हावे, म्हणजे आम्ही प्रचार करायला तयार असल्याचे स्पष्ट केले.
शिवेंद्रराजे प्रथमच स्पष्ट बोलले..आजपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आदी नेतेमंडळरींचे सातारा जिल्हा दौरे झाले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल, त्याचे काम करू असे उत्तर देताना खा. उदयनराजे भोसले यांच्याबाबत स्पष्ट मत टाळले होते. मात्र, यावेळी प्रथमच त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत सूचक अन् स्पष्ट भाष्य केले आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी सुरूचीवर येवून केलेली ही दिलजमाई चर्चेचा विषय ठरली आहे.