संजय पाटील/ऑनलाइन लोकमतक-हाड ( सातारा ), दि. 25 - पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना नैवेद्य दिला जातोय. बहुतांश गावात या नैवेद्याला काकस्पर्शही होतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी गावचं दुखणं वेगळचं आहे. या गावातील स्मशानभूमीकडे गेल्या पंचवीस वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी गावाने हरतऱ्हेचे प्रयत्न केलेत; मात्र परिस्थिती बदललीच नाही.जखिणवाडीची स्मशानभूमी. वेळ सकाळी दहा ते अकराची. अंत्यविधीसाठी ठाव मांडलेला; पण दूरवर कावळ्यांचा मागमूसही नाही. ग्रामस्थांनीही पूर्वानुभवाने हेच गृहित धरलेलं. अखेर गाईने नैवेद्य शिवला अन् आप्तस्वकीय, पै-पाहुण्यांसह भावकी मार्गस्थ झाली. गावात हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांत एकही ठाव कावळ्याने शिवला नसल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. नदीकाठावर गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही, हीच सल ग्रामस्थांच्या मनात आहे. सर्वसाधारणपणे गर्द झाडी व नदीकाठच्या विस्तारलेल्या झाडांवर कावळ्यांचे वास्तव्य असते. उंच झाडावर फांदीच्या बेचक्यात हा पक्षी काट्याकुट्यांचे ओबडधोबड घरटे बांधतो़ तेथेच तो समूहाने वास्तव्य करतो; पण सध्या काट्याकुट्याची घरटी ओकीबोकी पडलीयेत. कावळा दृष्टीस पडणे दूरच; पण दूरवरून त्याची कावकावही ऐकायला येत नाही. कावळे गावावर रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे निर्माण झालीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी अंधश्रद्धेतून येथे अनेक मार्ग काढले जातायत वेगवेगळे विधी केले जातायत; पण परिस्थिती बदलत नाही, असे येथील ग्रामस्थ सांगतात. कावळ्यांची संख्या कमी झाली, असं म्हणावं तर शिवारात कावळे दिसतात. मात्र, ते स्मशानभूमीकडे फिरकत का नाहीत, याचं कोडं आम्हाला उलगडेना. जखिणवाडीचे माजी सरपंच रामराव नांगरे-पाटील लोकमतला सांगत होते़, एका ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी आम्ही गावातील सर्व देवतांच्या मूर्ती रंगविल्या़ स्मशानभूमीत शांतता विधी केला; पण कावळ्यांची नाराजी दूर झालेली नाही़ सर्व देवतांना नैवेद्य देऊनही या समस्येतून मार्ग निघालेला नाही़.तालुक्यातील चचेगावातही हीच स्थिती आहे. कावळे रुसल्याचा समज करून घेऊन ग्रामस्थ उपाय शोधण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी अंत्यविधीचा नैवेद्य शिवायला एकतरी कावळा यायचा; पण सध्या स्मशानभूमीत एकही कावळा दिसत नाही. अंत्यविधीवेळी कावळ्याची वाट पाहणंच आता आम्ही सोडून दिलंय, असं तेथील ग्रामस्थ सांगतात. नारायणवाडीतही ग्रामस्थ आता कावळ्याची वाट पाहत नाहीत. वाट पाहणं व्यर्थ ठरतंय, असं तेथील ग्रामस्थांचंही मत आहे. अंत्यविधीवेळी हे ग्रामस्थ गाय घेऊन येतात. गाईने नैवेद्य शिवला तर ठिक नाही तर नैवेद्य नदीपात्रात सोडला जातो, असं काही ग्रामस्थ सांगतात. डोमकावळा अन् गावकावळाकावळा हा पक्षी वर्गाच्या काक कुलातील पक्षी आहे. गावकावळा व डोमकावळा असे त्याचे दोन प्रकार आहेत. गावकावळ्याच्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते़ मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो. डोमकावळा दणकट असतो़ त्याची चोच अधिक धारदार आणि बळकट असते़ तसेच सर्वांगावर चकचकित काळाभोर रंग असतो.सर्वभक्षी असूनही कावळा गायब!कावळा सर्वभक्षीय आहे. त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्याची संख्या घटली, असे म्हणणे उचीत ठरणार नाही. स्वच्छतादूत म्हणून हा पक्षी परिचित आहे. तसेच छोट्या पक्ष्यांची पिले तो खातो़ पिकांवरील कीटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षीतज्ज्ञांसमोर आहे.
काकस्पर्श होईना... गावावर म्हणे कावळा रुसलाय!
By admin | Published: September 25, 2016 10:36 PM