बामणोली : मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे शिवसागर जलाशयापलीकडे असणारी कांदाटी खोऱ्यातील तीसपेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत.
कांदाटी खोरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्ह्यात आहे. या परिसरातील सोनाडी, दरे, पिंपरी, आकल्पे, लामज, निवळी, वाघावळे, उचाट, मेटसिंदी, पर्वत, शिंदी, कांदाट, कांदाट बन, आरव, मोरणी, सालोशी, कुसापूर, आडोशी, माडोशी, रवदी, शेल्टी, तांबी, उत्तेश्वर, आकल्पे मुरा, लामज मुरा, पिंपरी मुरा, अहिरमुरा या प्रत्येक गावामध्ये नुकसानकारक पाऊस पडला. दरडी कोसळून रस्ते, भातशेती गाडली गेली आहे.
ओढ्याकाठी असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या भातशेतात पाणी शिरून भात खाचरे गाडली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावरच वीसपेक्षा अधिक ठिकाणी दरडी पडल्या आहेत. गुरुवार, दि. २२ रोजी लामज मुरा येथील संदीप गंगाराम ढेबे हे जनावरे लामज व वाघावळे गावांमध्ये असणाऱ्या माकड दरा या गावच्या डोंगरामध्ये दिवसा गुरे चारत होते. सायंकाळी चारच्या सुमारास या डोंगरात प्रचंड मोठी दरड कोसळली. संपूर्ण डोंगर कोसळला. या डोंगरात त्यांची सत्तर जनावरे गाई, म्हैशी गाडल्या गेल्या. संदीप ढेबे थोडक्यात बचावले आहेत. ते गंभीर जखमी आहेत. दीड हजार फूट डोंगरातून ते पायथ्याशी असणाऱ्या वाघावळे गावात दरडीबरोबर आले. त्यांना गावकऱ्यांनी मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी डोली करून रात्रभर डोंगरातून चालत तापोळा येथे दवाखान्यात हलविले. त्यांना बोलता येत नाही. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे.
त्या दरडीने वाघावळे गावाची अर्धी भातशेती गाडली आहे, तेव्हापासून वीज बंद आहे. फोन बंद आहेत. रस्ते बंद आहेत. कोणाचा कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या गावात काय घडले कोणाला काहीही कळत नाही. स्थानिक लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. आस्मानी संकट उभे ठाकले आहे.
कोट
माझी आकल्पे गावातील पाच एकर भातशेतीसह सेंद्रिय शेती दरड कोसळून गाडली आहे. रस्त्यावर दरड कोसळून सहा दिवसांपासून गावांचा संपर्क तुटला आहे. अजूनही संततधार पाऊस कोसळत आहे. जवळील गावांमध्ये काय घडले आहे, याचा शेजारील गावांना थांगपत्ता नाही. पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी तुटल्याने प्यायला पाणी नाही. आम्ही शंभर वर्षे पाठीमागे गेलो आहोत.
- शशी भातोसे,
शेतकरी आकल्पे, ता. महाबळेश्वर
फोटो २७बामणोली
वाघावळे येथील माकड दरा डोंगर कोसळून संदीप ढेबे यांची सत्तर जनावरे गाडली गेली होती. तसेच भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. (छाया : लक्ष्मण गोरे)