वाढे : रब्बी हंगाम सुरू असताना आरळे (ता. सातारा) हद्दीतील सहा महिन्यांपूर्वी केलेल्या कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या कालव्यावर ओलिताखाली असलेल्या हजारो एकर जमिनीला पाणी मिळणार नसल्याने शेतकऱ्यांवर संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, कण्हेर पाटबंधारे उपविभाग क्रमांक एकच्या कृष्णा सिंचन विभागाच्या माध्यमातून कालव्याच्या डागडुजीसाठी लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखविले आहेत तरीही भगदाड पडल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर हे मोठे प्रकल्प आहेत. या धरणाच्या पाण्यावरच रब्बी हंगाम अवलंबून असतो. कण्हेर पाटबंधारे उपविभाग क्रमांक एकच्या कृष्णा सिंचन विभागातील अधिकारी व ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फटका आरळे, वडूथ, वाढे, पाटखळ व परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. सहा महिन्यांपासून आरळे हद्दीत विद्युत पंपगृहानजीक असलेल्या कालव्याची सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून अस्तरीकरणासह डागडुजी करण्यात आली; परंतु चार दिवसांपूर्वी येथील कालव्याला दहा ते पंधरा फुटांचे भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातून सिंचन सुरू असताना लाखो लिटरचे पाणी वाया गेले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यापूर्वी हा कालवा अनेकदा फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अनुभव पाठीशी असतानाही अधिकारी, ठेकेदार कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी कण्हेर, धोम धरणाच्या कालव्यांची डागडुजी आणि गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून येत असतो. प्रत्यक्षात या कामावर किती खर्च केला जातो हा संशोधनाचा विषय आहे. कालव्याच्या दुरुस्तीचा खर्च कागदोपत्री होत असल्याने वरचेवर कालवा फुटीच्या घटना होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत होऊ लागला आहे. येथील कालव्याच्या कामात योग्य क्षमतेचे लोखंडी बार बसविले नसून काही ठिकाणी त्याचा वापरच केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे. सिमेंटचा केवळ मुलामा लावलेल्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्णपणे ढासळलेले असून कालवा फुटीच्या वारंवार घटना निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चौकट
लोकप्रतिनिधीचे मौनच
या कालव्यावरती हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आर्थिक नुकसानीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कालवा फुटीच्या घटना घडत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी बसले आहेत. काम मंजूर करण्यापासून ते शेवटचे बिल काढेपर्यंत ठेकेदाराकडून दिल्या जाणाऱ्या टक्केवारीच्या लोण्याचे वाटेकरी अनेकजण असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी धोम धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके व शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो
११कण्हेर कालवा
कण्हेर डावा कालव्याला आरळे हद्दीत भगदाड पडले आहे. त्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. (छाया : सुनील शिंदे)