सातारा : सातारा तालुक्यातील कण्हेर आणि वेळे कामथी येथे झालेल्या घरफोडीत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कण्हेर येथील गणेशनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. अज्ञाताने एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी घरातील ३२ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड चोरली. याप्रकरणी चतुरा बाळकृष्ण सकुंडे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वेळे कामथी येथेही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. गावातील वेदांत किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. आतील ५३ हजारांची रोकड नेण्यात आली. तसेच गावातीलच प्रभावती बाळकृष्ण चव्हाण यांच्या घरातही चोरी झाली. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने नेले. यामध्ये राणीहार, रिंगा, मंगळसूत्र लंपास केले. या दोन्ही चोरींत २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज नेण्यात आला. याप्रकरणी लालन चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, या दोन्ही गावांतील घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
....................................................