मलाकपूर : कापिल, ता. कऱ्हाड या छोट्याशा गावाने २४ तास नळ पाणीपुरवठा योजनेत सहभाग घेऊन अल्प कालावधीतच योजना कार्यान्वित केली. स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणीपुरवठा करणारे ग्रामपंचायत स्तरावरील हे राज्यातील पहिलेच गाव आहे. योजनेची तपासणी झाल्यानंतर गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मलकापूर येथील पाणी योजनेचा आदर्श घेऊन तालुक्यातील १५ गावांना २४ बाय ७ नळपाणी पुरवठा योजनेत सहभाग घेतला होता. त्या सर्व गावांपैकी कापिल गावातील ग्रामस्थांनी उत्स्फू र्तपणे सहभाग घेऊन दीड वर्षाच्या अल्पकालावधीतच योजना कार्यान्वित करून दि. १५ फेब्रुवारी पासून गावातील सर्व ग्रामस्थांना स्वयंचलित यंत्रणेद्वारे २४ तास पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी मलकापूर प्रमाणेच ए. एम. आर. पद्धतीचा आल्ट्रासॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. या योजनेचे सर्व काम संभाजी पाटील व नरेंद्र जानुुगडे यांनी केले. तर तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बी. के. वानखेडे, के. आर. ओतारी यांनी काम केले. दोन कोटी २५ लाख रुपये खर्चाची ही योजना कार्यान्वित करून १५ फेब्रुवारी पासून गावात मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे २४ बाय ७ या अत्याधुनिक पद्धतीने पाणीपुरवठा करणारे ग्रामपंचायत स्तरावरील हे राज्यातील पहिलेच गाव असावे. योजनेचे उद्घाटन करण्याची औपचारिकता बाकी आहे. (वार्ताहर)केंद्रीय पथकाची भेट पंतप्रधान पुरस्कार प्राप्त मलकापूरच्या योजनेची सद्य:स्थिती पाहणीसाठी केंद्रीय पथक आले होते. कापिल गावानेही अशीच योजना कार्यान्वित केली असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयएएस अधिकारी अशोक कुमार, बलराज सिंग, शालिनी रैना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित कापिलच्या योजनेस भेटी दिल्या. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या प्रेरणेने व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, ही कापिलची योजना पूर्ण झाली गावातील सर्वांच्याच सहकार्याने योजना सातत्याने पुढे चालवून पाणी व वीजबचतीतही मलकापूरचा आदर्श घेणार आहेत.-रेखाताई जाधव पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षा, कापिल
कापिलची चोवीस तास पाणी योजना कार्यान्वित
By admin | Published: February 22, 2015 10:11 PM